सीबीआय कोणाच्या आदेशानुसार चौकशी करते हे भाजपनेच दाखवून दिले : सचिन सावंत
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. सीबीआय कोणाच्या आदेशानुसार चौकशी करते हे भाजपने दाखवून दिले, असा घणाघात सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.
सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपच्या मागणीवर घणाघाती टीका केली आहे. राज्यांशी संबंधित विषयांवर सीबीआय चौकशी राज्य सरकार किंवा उच्च न्यायालय निर्देशीत करते. पण वस्तूत: हल्ली सीबीआय कोणाच्या मार्गदर्शन व आदेशानुसार चौकशी करते हे भाजपने दर्शवून दिले त्याबद्दल भाजपाचे धन्यवाद! महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच कारणामुळे सीबीआय चौकशीवर बंदी घातली आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलं आहे. भाजपची नुकतीच कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करावी, असा ठराव संमत केला होता. त्यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.