Top Newsराजकारण

हिमाचल, पश्चिम बंगाल, राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला दणका; काँग्रेस, तृणमूलची मुसंडी

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमधील २९ विधानसभा आणि ३ लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. प्रतिष्ठेच्या केलेल्या महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली विधानसभा आणि केंद्रशासित दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतही भाजपची पिछेहाट झाली आहे.

बंगालमध्ये ममता बॅनर्जींची जादू कायम

पश्चिम बंगाल विधानसभेच्या ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू पुन्हा चालली आहे. दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते. तृणमूलच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या आहेत. दिनहाटामधून उदयन गुहा, खर्डामधून शोभनदेव चट्टोपाध्याय, गोसाबातून सुब्रत मंडल आणि शांतीपूरमधून टीएमसीचे उमेदवार ब्रजकिशोर गोस्वामी विजयी झाले आहेत. या विजयासह विधानसभेत तृणमूलच्या आमदारांची संख्या २१७ झाली आहे. तर, भाजपमधून आलेल्या आणखी पाच आमदारांचा समावेश केल्यास ही संख्या २२२ वर पोहोचली आहे.

हिमाचल प्रदेशात एका लोकसभेसह तीन विधानसभा जागांवर काँग्रेस विजयी

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेसह तीन विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. चारही जागांवर काँग्रेसने मोठा विजय मिळवला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृहजिल्हा असलेल्या मंडी लोकसभेची जागाही भाजपला वाचवता आली नाही. याशिवाय अर्की, फतेहपूर आणि जुब्बल-कोटखई या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

मंडी लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ८७६६ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. त्यांना ३६५६५० मते मिळाले, तर भाजपचे उमेदवार कुशल सिंह ठाकूर यांना ३५६८८४ मते मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button