गोव्यात भाजपला गळती सुरूच; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. प्रवीण झांट्ये यांचा राजीनामा
आतापर्यंत चार जणांचा पक्षाला रामराम
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला धक्के बसत आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार गोव्यामध्ये येत्या १४ फेब्रुवारीला मतदान आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपमधून काही आमदार बाहेर पडले आहेत. आता या यादीमध्ये आणखी एका आमदाराच्या नावाचा समावेश झाला आहे. आमदार प्रवीण झांट्ये यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. झांट्ये यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते पक्षातून देखील बाहेर पडले असल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार प्रवीण झांट्ये यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यापूर्वी गोव्याचे भाजपा मंत्री मायकल लोबो यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. प्रवीण झांटे यांच्यासह आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये कार्लोज अल्मेडिया, एलिना सालदना, मायकल लोबो आणि प्रवीण झांटे यांच्या नावाचा समावेश आहे. हे सर्व आमदार पक्षावर नाराज असल्याची चर्च सुरू आहे. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता प्रवीण झांटे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
दरम्यान यापूर्वी जेव्हा मायकल लोबो यांनी आपल्या मंत्रीपादाचा राजीनामा दिला होता, तेव्हा ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. आता प्रवीण झांटे यांनी देखील राजीनामा दिला आहे. झांटे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच अपक्ष आमदार असलेल्या प्रसाद गावकर यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. गोव्यामध्ये येत्या १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मात्र त्याचपूर्वी गोवा भाजपला गळती लागली आहे. आतापर्यंत एकूण तीन आमदार आणि एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे माणण्यात येत आहे.