राजकारण

नेमकी भुताटकी कुठे झाली?; भाजपची संजय राऊतांना ‘गुगली’

मुंबई: १२ विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर राज्याचे राजकारण तापलेले असताना, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. तसेच राज्यपाल आमदारांच्या नियुक्तीबाबत चालढकल करत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्याचे भाजपने म्हटले आहे. यावर सरकारने आता खुलासा करावा असे आवाहन भाजपने केले आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त झालेले उत्तरच ट्विटच्या माध्यमातून लोकांपुढे ठेवले आहे. सोमेश कोलगे यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली होती. आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कधी पाठवला?, कोणती नावे पाठवली?, काही उत्तर आले का?, असे प्रश्न कोलगे यांनी विचारल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले आहे. हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले असून संजय राऊत आता नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी खासदार संजय राऊत यांना विचारला आहे.

जर हा प्रस्ताव विचाराधीन असेल, तर मग काही प्रश्नांचा खुलासा व्हायला हवा, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. जर हा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे, तर मग पूर्वी ठरलेली नावं बदलण्याचा प्रस्ताव आहे का?, तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? आणि मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?, असे एकावर एक तीन प्रश्न उपाध्ये यांनी सरकारला विचारले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button