नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षानं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात भाजपचं नेतृत्त्व करणारे फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजप नेतृत्त्वानं गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली आहे. २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपनं ७० हून अधिक जागा जिंकत संयुक्त जनता दलासह सत्ता कायम ठेवली. त्यामुळे आता गोव्यात फडणवीस काय करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
गोवा विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. गोवा राज्य आकारानं लहान आहे. मात्र ते संवेदनशील समजलं जातं. गोवा बराच काळ अस्थिर राहिलं आहे. मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याला स्थिर सरकार मिळालं. मात्र त्यांच्या निधनानंतर गोवा भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला गोव्यात १३ जागा मिळाल्या. त्यांच्या ८ जागा कमी झाल्या होत्या. काँग्रेसनं १७ जागा जिंकल्या. मात्र काँग्रेसपेक्षा कमी जागा जिंकूनही भाजपनं छोट्या पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केलं.
गोव्यात विधानसभेचे ४० मतदारसंघ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २१ हा जादुई आकडा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून बराच दूर राहिला होता. मात्र मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील, तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, अशी भूमिका गोवा फॉरवर्ड पक्षानं घेतली. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सूत्रं हलवली. पक्ष नेतृत्त्वानं हिरवा कंदिल दाखवला आणि पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पर्रिकर यांचं मार्च २०१९ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर भाजप पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरत आहे.
राज्यात भाजपचा चेहरा असलेले फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच राज्यातील भाजपचं सरकार गेल्यानंतरही त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीची जबाबदारी फडणवीसांनी सांभाळली. मित्रपक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा जिंकत भाजपनं या निवडणुकीत कमाल केली. फडणवीसांनी निवडणुकीचं उत्तम व्यवस्थापन केल्यानं भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ झाला, तर जेडीयूला लहान भावाच्या भूमिकेत जावं लागलं.