राजकारण

शिवसेनेच्या खा. विनायक राऊतांनी भाजपच्या आ. नितेश राणेंची पाठ थोपटली !

सिंधुदुर्ग : कोकणात शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमधील वाद ही काही नवी बाब नाही. शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय संघर्ष नेहमी रंगलेला असतो. पण रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे एक वेगळंच पहायला मिळालं. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने विनायक राऊत आणि नितेश राणे एकत्र येताना दिसले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते. मात्र यावेळी चित्र उलट होते.

नितेश राणे आणि विनायक राऊत हे एकमेकांच्या कानात हितगुज करताना पहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल, या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिलेत.

नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहीर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली.

या वास्तूच्या लोकार्पणाच्या भाषणात लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी सर्वचे नेत्यांनी कोकणाच्या विकासासाठी एकत्र येण्याची सल्ला दिला. आणि नांदा सौख्य भरे असे सांगत एक वेगळा राजकीय संदेश कोकणातून दिला. सेना आणि राणे यांचा राजकारणात पटत नाही. नाराय़ण राणेंना मंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात सेना आणि भाजप किंबहुना राणे एकत्र आले. हे एकत्र येणं वेगळ्या राजकारणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button