राजकारण

श्रीरामाच्या नावावर चंदा गोळा करण्याचा भाजप आणि आरएसएसचा धंदा !

राम मंदिरासाठी आस्थेने पैसे दिलेल्या लोकांचा विश्वासघात; काँग्रेसची टीका

मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवला आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

राम मंदिरासाठी घेण्यात आलेल्या किमतीच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटांतच १८.५ कोटींची कशी झाली? भाजप व संघानं मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला आहे, या शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे परंतु रामाच्या नावावर चाललेला हा बाजार लांछनास्पद आहे. हा प्रकार रामभक्तांचा अपमान करणारा असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

संघ परिवाराने राम मंदिरासाठी याआधीही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती अद्याप त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर मंदिरासाठी जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेनेही २०१५ साली हाच आरोप केला होता. त्याशिवाय, काही क्विंटल सोने लुबाडल्याचा आरोपही विश्व हिंदू परिषदेवर झाला होता. त्याचेही उत्तर अद्याप संघ परिवाराने दिले नाही. याद्वारे जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आम्ही जानेवारीमध्येच व्यक्त केली होती, असे सचिन सावंत म्हणाले.

मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून पैसा वसुलीचा धंदा सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. परंतु धर्माचे ठेकेदार आपणच असल्याच्या अविर्भावात रामाच्या नावाने खुलेआमपणे पैसे कमावून लोकांच्या श्रद्धेशी खेळ चालवला आहे. बाबा हरिदास यांची मूळ जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आणि तीच जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १८.५ कोटी रुपयात विकण्यात आली. हा व्यवहार फक्त काही मिनिटांत झाला. एवढ्या कमी वेळात एका जमिनीचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वाढू शकतात?, अशी विचारणा सचिन सावंत यांनी केली असून, या व्यवहारासाठी एवढा मोठा मोबदला देऊन राम मंदिरासाठी पैसे दिलेल्या लोकांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button