डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराचा तगादा सुरू झाला आहे. यातच देशाचे दिवंगत सीडीएस बिपीन रावत यांचे धाकटे बंधू कर्नल विजय रावत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिल्लीत कर्नल विजय रावत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं असून दिल्लीत विजय रावत यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.
उत्तराखंड विधानसभेसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कर्नल रावत यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आणि कुटुंबीयांची विचारधारा भाजपाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे राजकारणात प्रवेश करुन जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे. पक्षानं परवानगी दिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यास तयार असल्याचंही विजय रावत म्हणाले.
दिवंगत सीडीएस बिपीन रावत हे उत्तराखंडमध्ये खूप सक्रिय होते. दोन वर्षांपूर्वी बिपीन रावत यांनी केदरानाथ आणि गंगोत्री धामचे दर्शन घेतल्यानंतर १९ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या पत्नीसह मूळ गावी म्हणजेच उत्तरकाशीतील डुंडा ब्लॉकस्थित ननिहाल धाती येथे पोहोचले होते. गावाला भेट दिल्यानंतर बिपीन रावत यांनी गावकऱ्यांची मोठ्या आत्मियतेनं विचारपूस केली होती. देशाचा लष्करप्रमुख आपल्या गावचा रहिवासी आहे आणि आज तो आपल्याशी बोलत आहे याचा प्रत्येक गावकऱ्याला अभिमान वाटत होता. जेव्हा गावातील नागरिकांच्या समस्या बिपीन रावत यांनी जाणून घेतल्या होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गावकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं अशा भावना दिसून आल्या होत्या, असं विजय रावत म्हणाले.