नवी दिल्ली: देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. हेलिकॉप्टरमधील १४ जणांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज विशेष विमानाने सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. दोघांवर दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे बिपीन रावत यांचं मूळ राज्य असणाऱ्या उत्तराखंडमध्ये राज्य सरकारनं तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणलं जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रावत यांची छोटी बहीण आणि भाऊ उपस्थित राहणार आहेत. जनरल रावत यांना दोन मुली आहेत.
उत्तराखंडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.रावत यांच्या निधनानं दु: ख झाल्याचं पुष्कर सिंह धामी म्हणाले. रावत यांनी देशासाठी जीवन समर्पित केल्याचं धामी म्हणाले. बिपीन रावत यांचा जन्म उत्तराखंड येथील पौडी गढवालमध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबाला सैन्य दलातील सेवेचा वारसा देखील आहे. बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह रावत लेफ्टनंट जनरल होते.
मनोज नरवणे पुढील सीडीएस?
देशातील सैन्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झाली आहे की, देशाचे पुढचे सीडीएस कोण? सेवाज्येष्ठतेचा विचार करता जनरल मनोज एम. नरवणे हे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. तिनही सेना प्रमुखांमधून सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. अशातच नौदलाचे अधिकारी एडमिरल करमवीर सिंह सर्वात ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे आहेत. जर या दोघांमध्ये अनुभव आणि सेवाज्येष्ठतेचा विचार केला तर, एम. एम. नरवणे हेच या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. नरवणे हे ६० वर्षांचे आहेत. जनरल बिपिन रावत यांच्यानंतर त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे युद्धनितीतील सर्वात मोठे जाणकारही आहेत.
सध्या एम. एम. नरवणे हे लष्कर प्रमुख आहेत. यापूर्वी ते लष्कराच्या उत्तरेकडील कमांडचे प्रमुख होते. नरवणे यांनी आपल्या ४ दशकांच्या लष्करातील कार्यकाळात अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. काश्मीर ते ईशान्येकडील राज्यांमध्ये तैनात असताना दहशतवादी कारवाया रोखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नरवणे श्रीलंकेत १९८७ दरम्यान पार पडलेल्या ऑपरेशन पवनमध्ये पीस कीपिंग फोर्सचा महत्त्वाचा भाग होते. जनरल एम. एम. नरवणे यांनी १ सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.