मुंबई : शिवसेना आमदार सुनील प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावर बोलताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर दावे केलेत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस भाजप नेत्याच्या गाडीने फिरत होते. तसंच, सुशांत सिंग राजपूत ट्रेंड करण्यासाठी ३० लाख रुपये देण्यात आले असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला.
सुनील प्रभु यांनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. राज्यातील एका मंत्र्यांना व्हॉट्सअॅपवर धमकी येते. राजपूत नावाच्या व्यक्तीला अटक होते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्यानंतर या महाराष्ट्रात ही आत्महत्या नाही हत्या आहे असं सांगत सुशांत सिंग राजपूतच्या आडून बऱ्याचशा मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. सुशांत सिंग राजपूतच्या हत्येमागे रिया चक्रवर्ती असल्याचं म्हणत तिच्यावर दडपण आणून गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्या मुंबईत झाली, बिहारमध्ये तक्रार नोंद होते. तो तपास बिहारचे पोलीस मुंबईमध्ये करण्यासाठी येत असताना बीएमडब्लू आणि मर्सिडीज गाडीमध्ये फिरत होते. ती गाडी भाजपच्या एका नेत्याची होती, असं नवाब मलिक म्हणाले.
त्या नेत्याचं नाव आहे निलोपल उत्पल. त्या दिवसापासून आजपर्यंत सुशांत सिंग राजपूत ट्रेंड होत आहे. ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी ३० लाख रुपये… स्मगलर निलोपल उत्पल ज्याला कस्टमने सोनं आणताना पकडलं होतं. तेव्हा समीर वानखेडे नावाचे अधिकारी कस्टममध्ये होते. त्या निलोपल उत्पलला सुशांत सिंग राजपूत ट्विटरवर ट्रेंड होण्यासाठी ३० लाख रुपये महिने पैसे पुरवण्याचे काम होतं, असा दावा मलिक यांनी केला.
सुशांतसिंग राजपूतचा केस रजिस्टर झाल्यानंतर कायद्याने मुंबईत ट्रान्सफर होणं बंधनकारक होतं. तिथल्या सरकारने निर्णय घेतला हे प्रकरण सीबीआयला द्यायचं. सीबीआयला प्रकरण दिल्यानंतर हत्या की आत्महत्या अद्याप निश्चित झालेलं नाही. याचे धागेदोरे कर्नाटकशी जोडलेले आहेत, असं मलिक म्हणाले. तसंच, पुढए बोलताना “समीर वानखेडेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत असताना ट्विटरच्या माध्यमातून मला धमक्या येत आहेत. मला बरेचशे पत्र आलेले आहेत मी गृहमंत्र्यांना पाठवले आहेत, अशी माहिती मलिक यांनी सभागृहाला दिली.
कलबुर्गी, दाभोलकर सनातन सारख्या संस्था या हत्येमागे आहेत. मागील पाच वर्षात काय काय घडवून आणलं या संस्थेनं…गोव्यामध्ये भाजप सरकार असताना त्यांना पाठराखण केली जात आहे. कर्नाटकमध्ये पाठराखण केली जात आहे. पाच वर्षात त्या संस्थेची पाठराखण करण्याचं काम करण्यात आलं. बऱ्याचशा मंत्र्यांना धमकी येत आहे. यासाठी एक एसआयटी नेमली पाहिजे. याच्यात वानखेडे, बिहार सरकार, बिहारचे पोलीस, निलोपल उत्पल असेल त्याच बरोबर ट्विटर हँडल, धमक्या, कलबुर्गी, गौरी लंकेश हत्या हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे, असं मलिक म्हणाले.