
मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टानं आणखी एक धक्का दिला आहे. आर्यन खान याच्यासह अटकेत असलेल्या इतरांच्या न्यायालयीन कोठडीत आता ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीनासाठी गेल्या १६ दिवसांत ४ वेळा जामीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण त्यात कोणतंही यश आर्यन खानच्या वकिलांना आलेलं दिसत नाही. आज तर कोर्टानं न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ करुन पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे.
विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यन खान याला जामीन नाकारल्यानंतर वकिलांनी जामीनासाठी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. पण आज मुंबई हायकोर्टात त्यावर सुनावणी होऊ शकली नाही. एनसीबीच्या मागणीनुसार मुंबई हायकोर्टात आता मंगळवारी आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे. आर्यनच्या सुटकेसाठी आता वकील मुंबई हायकोर्टात जोरदार प्रयत्न करत आहेत. हायकोर्टाच्या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
मुंबई हायकोर्टातील सुनावणीवेळी आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणीची मागणी केली. पण एनसीबीच्या वकिलांकडून कोणतीही प्रत आम्हाला प्राप्त झालेली नसून संपूर्ण तयारीसाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं म्हटलं. हायकोर्टानं एनसीबीची मागणी मान्य करत मंगळवारी आर्यन खानच्या जामीन याचिकेवरील सुनावणीला सुरुवात होणार आहे.