भाजपला धक्का; माथेरानचे पक्षांतर केलेले १० नगरसेवक अखेर निलंबित
अलिबाग : माथेरान नगरपरिषदेच्या दहा बंडखोर नगरसेवकांच्या प्रकरणात अखेर शिवसेनेच्या बाजूने निकाल लागला असून, या ९ नगरसेवक व १ स्वीकृत अशा दहा नगरसेवकांना अपात्र ठरवत जिल्हाधिकार्यांनी त्यांचे नगरसेवकपद निष्कासित करण्यात आले आहे. शिवसेना गटनेते प्रसाद सावंत यांच्या वकीलांमार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात झालेल्या अंतिम सुनावणी दरम्यान युक्तिवादात या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची कारणे विषद करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी निर्णय राखून ठेवला होता. या युक्तिवादानंतर भारतीय जनता पक्षात गेलेल्या नगरसेवकांच्या वकीलांकडून या नगरसेवकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या या नगरसेवकांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी संबंधित नगरसेवकांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिल्याचे तसेच भाजपत प्रवेश घेतल्याचे नाकारले होते.
याबाबतचा निकाल जिल्हाधिकार्यांनी आज २९ ऑक्टोबर रोजी दिला. त्यानुसार नगरसेविका रूपाली तुकाराम आखाडे, प्रियंका विनोद कदम, ज्योती कैलास सोनावळे, प्रतिभा प्रदिप घावरे, सुषमा कुलदीप जाधव, सोनम सचिन दाभेकर, नगरसेवक संदीप नारायण कदम, राकेश नरेंद्र चौधरी तसेच उपनगराध्यक्ष आकाश कन्हैया चौधरी या माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेतील ९ सदस्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ मधील कलम ३(१) कडील तरतुदीनुसार व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम१९८७ चा नियम ८(१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदस्य म्हणून अनर्ह घोषित केल्याचा निकाल जिल्हाधिकार्यांनी जाहीर केला. या निर्णयानंतर माथेरान शिवसेनेच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.या सर्व प्रकरणात शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेत बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने आज अखेर शिवसेनेचाच विजय झाला आहे.