स्पोर्ट्स

आयसीसी पुरस्कारासाठी भुवनेश्वर कुमारला नामांकन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला नामांकन मिळाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच टी-२० व एकदिवसीय मालिका पार पडली. या दोन्ही मालिकांमध्ये भुवनेश्वरने दमदार कामगिरी केली. त्यामुळे अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आणि झिम्बाब्वेचा सिन विल्यम्स यांच्यासह भुवनेश्वरला आयसीसीच्या मार्च महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तसेच महिलांमध्ये राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव या भारताच्या खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल लीला नामांकन मिळाले आहे.

भुवनेश्वरला मागील काही दुखापतींनी सतावले असून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. टी-२० मालिकेचे पाचही सामने अहमदाबाद येथे झाले, जिथे गोलंदाजांना फारशी मदत नव्हती. त्याने पाच सामन्यांत केवळ चार विकेट घेतल्या असल्या तरी इंग्लंडच्या फलंदाजांना त्याच्याविरुद्ध धावा करणे अवघड गेले. त्याने केवळ ६.३८ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. त्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ६ विकेट काढल्या.

मार्च महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भुवनेश्वरची राशिद खान आणि सिन विल्यम्सशी स्पर्धा आहे. झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात राशिद खानने ११ विकेट घेत अफगाणिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. तर झिम्बाब्वेच्या सिन विल्यम्सने या कसोटी मालिकेच्या दोन सामन्यांत २६४ धावा करताना २ विकेटही घेतल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button