राजकारण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. बाळासाहेबांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. या आराखड्यानुसार येथे बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली आहे. स्मारकासाठी भू-वापर तसेच पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या वास्तू उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ पार पडला. या सोहळ्याचे थेट पक्षेपण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या स्मारकाच्या वैशिष्ट्यांमध्ये बाळासाहेबांचा संपुर्ण राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक प्रवास उलगडून दाखवणाऱ्या चित्रांपासून ते व्हिडिओ आणि व्हर्च्यूअल रिएलिटीच्या तंत्रज्ञानाची पर्वणी ही स्मारक पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी असणार आहे. तसेच शिवसेनेच्या पहिल्या नगरसेवकापासून ते पहिला मुख्यमंत्री त्यासोबतच शिवसेनेचे आणि हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान हा सगळा प्रवास या स्मारकाच्या निमित्ताने पर्यटकांसाठी एक सुखावणारा असाच अनुभव असणार आहे.

बाळासाहेबांच्या शब्दांना धार देणारा त्यांचा कुंचल्याचा फटकारा कायमच प्रभावी ठरला. फ्री प्रेसमध्ये काम करणारे कार्टूनिस्ट वाईट प्रवृत्तींचा कर्दनकाळ ठरले तेच बाळासाहेब त्यांच्या विविध छटांमधून इथे दिसणार आहेत. जुन्या आणि चिरतरूण तसबिरीतून त्यांच्या प्रवासाची दालन याठिकाणी साद देतील. काही चित्रफिती काही भास निर्माण करणारी व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे दिसणारे प्रसंग तसेच बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाला विषद करणाऱ्या चित्रफिती पर्यटकांना वेगळ्या विश्वात घेऊन जातील. समुद्र किनारा हा भव्य वास्तूसंग्रहलायची भव्यता विषद करेल.

बाळासाहेबांची कौटुंबिक जडणघडण आणि समाजप्रबोधनातून राजकीय वाटचालीस केलेला प्रवास त्या प्रवासाच सचित्र दर्शन इथे घडणार आहे. बाळासाहेबांना संघटनेच नाव प्रबोधनकारांनी बहाल केले. महाराष्ट्राच्या जडणघडणेत बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे योगदान स्वतंत्र ठसा उमटवणारे असे आहे. मराठी माणसाच्या मूलभूत हक्कासाठी बाळासाहेबांनी जंगजंग पछाडलं. आपला आवाज उठवला आणि बघता बघता तो आवाज घराघरातला लोकप्रिय आवाज ठरला. त्यांची जडणघडण आणि राजकीय पातळीवरची महत्व या दालनातून अनुभवता येईल.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच या स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी आवश्यक परवानग्याही युती सरकारच्या काळातच मिळाल्या होत्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली होती. या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत पूर्ण केलं जाणार आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 250 कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगीचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, इत्यादी कामांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा / गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक, इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. संपूर्ण खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button