
टोक्यो : जपानची राजधानी टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताची स्टार टेबल टेनिस प्लेअर भाविना पटेलनं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. भाविना पटेल आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देण्यापासून अवघं एक पाऊल दूर आहे.
सेमीफायनल जिंकणं भाविना पटेलसाठी सोपं आव्हान नव्हतं. कारण भाविना पटेलनं जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू मिओचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भाविनानं मिओचा ३-२ (११-७, ७-११, ४-११, ११-९, ११-८) असा पराभव केला आहे. या विजयासह भाविनानं अंतिम फेरी गाठली असून टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक निश्चित केलं आहे.




