भागवत-ओवैसींचा डीएनए एकच, मग धर्मांतर कायद्याची गरज काय? दिग्विजय सिंह यांचा सवाल
भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू- मुस्लिम एकतेवरून केलेल्या वक्तव्यावरून जहरी टीका केली आहे. मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एक आहे. तर धर्म परिवर्तन आणि लव्ह जिहादविरोधी कायद्याची काय गरज आहे? तसेच त्यांनी मोहन भागवत आणि ओवैसींचा डीएनएसुद्धा एकच असल्याचे म्हटले आहे.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे म्हटले होते, तसेच, हिंदू-मुस्लिम ऐक्यावरून दिशाभूल केली जात आहे. कारण हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नसून एकच आहेत. लोक ज्याप्रकारे उपासना करतात त्या आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही. भारतात जर कोणी असे म्हणतं असेल की मुस्लिमांनी भारतात राहू नये तर तो हिंदू नाही. आपण लोकशाहीमध्ये राहतो. इथे हिंदी किंवा मुस्लिमांचे नाही, तर फक्त भारतीयच वर्चस्व असू शकते. असेही भागवत म्हणाले.
If the DNA of Hindus and Muslims is the same, then what is the use of the law against religious conversions? What is the use of the law against 'Love Jihad'? Then it means that the DNA of Mohan Bhagwat & Owaisi is the same: Congress leader Digvijaya Singh, in Sehore (MP) (07.07) pic.twitter.com/fqfXsGfZ3L
— ANI (@ANI) July 8, 2021
आरएसएस प्रमुखांच्या वक्तव्यावर यापूर्वीही दिग्विजय सिंह यांनी पलटवार केला होता. त्यांनी असे म्हटले होते की, जर तुम्ही व्यक्त केलेल्या मतांशी प्रामाणिक असाल तर, ज्यांनी निर्दोष मुस्लिमांना त्रास दिला, अशा नेत्यांना त्वरित त्यांच्या पदावरून हटविण्याचे निर्देश द्या. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यापासून सुरुवात करा. मोहन भागवत जी, तुम्ही हे विचार तुमच्या शिष्यांना, प्रचारकांना, विश्व हिंदू परिषदेला / बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही द्याल का? मोदी-शहाजी आणि भाजपाचे मुख्यमंत्री यांनाही द्याल का? असेही सवाल दिग्विज सिंह यांनी उपस्थित केले.