पुणे : आज बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपनं बहुमत मिळवलं, तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय.
माध्यमांशी बातचीतमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या वेळी एखाद्या निवडणुकीच्या निकाल त्यांच्या बाजुने असतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या स्वभावानुसारच आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. यावेळी त्यांना सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है’बाबत विचारलं असता, पाटील म्हणाले, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरुन थेट ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार, असं आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे.
राऊतांना अल्झायमर झालाय, त्यांना सकाळचं दुपारी आठवत नाही
‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही काय बोललो. ते क्लिअर कट अस म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो. ते पोलीस बघतील. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे’, असं पाटील म्हणाले.
‘बेळगावला महाराष्ट्रात आणण्यासाठी शेकडो लोकांनी प्राम गमावले. बाळासाहेब तुरुंगात गेले होते. अन् याच बेळगावात मराठी माणूस हरल्यावर तुम्ही पेढे वाटता. लाज नाही वाटत तुम्हाला. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.