मुक्तपीठ

स्वतंत्र प्रतिभेचे नेते बना !

- पुरुषोत्तम आवारे-पाटील

आगामी तीन चार महिन्याच्या काळात राज्यभर निवडणुका आहेत.नगर पालिका,महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षाना स्वतंत्र प्रतिभेच्या तरुण,तरुणींचा सतत शोध असतो.आपल्या सभोवताल एवढ्या राजकीय घडामोडी सतत घडत असतात की त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.ज्याचे शिक्षण आटोपले आणि नोकरी नाही अशा तरुण तरुणींना राजकारणाची भुरळ पडत असते,अशावेळी जर तयारी करून तुम्ही जाणीवपूर्वक या क्षेत्रात उडी घेतली तर यश हमखास मिळते मात्र कुणीतरी तुमच्यावर राजकारण लादले,अपघाताने तुम्ही त्यात पडला तर नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते.

आपल्यातील सामाजिक जाणिवा अधिक विस्तारित करणे म्हणजे राजकारण हा जुना अर्थ अलीकडे बाजूला पडला आहे.राजकारणाचा एवढा सोपा आणि साधा अर्थ त्या काळात होता जेव्हा राजकीय नेते आणि कार्यकर्ते शंभर टक्के प्रामाणिक ,प्रगल्भ आणि सामाजिक भान ठेवणारे होते. काळाच्या पुलाखालून जसे भरपूर पाणी वाहून गेले तसा राजकारणाचा पोत बदलला.राजकारण हे आपला कामधंदा सांभाळून फावल्या वेळात करण्याचे दिवस संपून आता राजकारण हा पूर्णवेळ करण्याचा व्यवसाय झाला आहे.हे करियर करण्याचे क्षेत्र बनले आहे त्यासाठी जुन्या संदर्भाना डोक्यातून काढून नवी मांडणी आणि नियोजन ज्यांना शक्य आहे अशांनी या क्षेत्रात उडी घ्यायला हवी.

जे पुस्तकातून राज्यशास्त्र शिकले त्यांना हे लक्षात येईल की प्रत्यक्ष गाव किंवा शहर पातळीवर घडणारे राजकारण आणि पुस्तकात शिकवलेले राजकारण यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. सार्वजनिक क्षेत्रात शेवटी आपल्या समाजात असणाऱ्या विविध प्रवृत्तीचे प्रतिबिंब उमटत असते.आपण ज्याला राजकीय डावपेच, बदनामी,शह काटशह ,चारित्र्य हनन किंवा आरोप प्रत्यारोप म्हणतो ती आजच्या राजकीय जीवनाची गरज असेल तर तुम्ही तसेच बनायला हवेत याची गरज नाही मात्र वेळप्रसंगी त्याची तयारी तुम्ही ठेवायला हवी हे ज्याला कळले असेल त्याने या क्षेत्रात उतरण्याची तयारी करायला हरकत नाही.

परोपकार,मदतीची भावना,मानवता,नवे करण्याचे धाडस आणि आपले व्हिजन इतरांना पटवून देण्याचा क्षमता आजच्या काळात कोणत्याही नेत्याची प्राथमिक शस्त्रे बनली आहेत. जात,धर्म याला या क्षेत्रात वाजवीपेक्षा जास्त महत्व आलेले असले तरी तुमच्यातील प्रभावी नेतृत्वगुण आणि व्हिजन त्यावर मात करून पुढे जाऊ शकते हा आत्मविश्वास तुम्हाला असायला हवा. थोडक्यात हे प्रचंड आत्मविश्वास आणि सतत प्रयोगांचे क्षेत्र आहे हे नजरेआड करून चालणार नाही.तुम्ही नगर पालिकेत राजकीय करियर सुरू करणार असाल तर किमान शंभर मित्रांचा ग्रुप आणि व्यापक संपर्क आवश्यक असतो.लोकांसाठी इतरांच्या तुलनेत वेगळे करण्याची क्षमता ही पहिली पायरी मानली जाते.

तरुण राजकारणात जाताना संभ्रमित होतात,अनुभवी म्हणून कुण्यातरी नेत्याचा सल्ला घेतात आणि पुढे त्याचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात करतात.लक्षात घ्या अशी सुरुवात आयुष्यभर कार्यकर्ताच ठेवते, एकेक पायरी पुढे चढायचे असेल तर स्वतंत्र बाणा आणि प्रतिभा आपल्यात विकसित करा,कुणाचे तरी भक्त किंवा अनुयायी बनला तर त्याचा जयजयकार करण्याशिवाय हातात काहीच पडणार नाही. तुम्ही स्वतःचे छोटेसे का होईना साम्राज्य निर्माण करा नेते आणि राजकीय पक्ष तुम्हाला शोधत येतील.स्वतःची प्रतिभा, व्हिजन आणि विकासाचे मॉडेल तयार करा त्यासाठी कठोर परिश्रम घ्या यश तुमच्या पायाशी लोळल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button