
भल्या सकाळी उधोजीराजेंची गाडी दिल्ली विमानतळावरून दिल्लीश्वरांच्या निवासस्थानाकडे निघाली आहे. आज आठ जून, म्हणजे जागतिक मैत्री दिन आणि नेमकी आजच आपली आपल्या जागतिक कीर्तीच्या मित्राशी भेट व्हावी ,हा योगायोग नक्कीच काहीतरी शुभ संकेत देतोय, या कल्पनेने उधोजीराजेंचे अंग शहारून येते. ते चोरट्या नजरेने त्यांच्यावर बारीक नजर ठेवणाऱ्या आणि त्यांच्याच शेजारी बसलेल्या ‘ पदसिद्ध रजाराखीव मुख्यमंत्र्यां’च्या लक्षात येताच ते ड्रायव्हरला, ‘ टेम्प्रेचर वाढीव रे.’ असं दरडावतात. समोरच्या सीटवर बसलेले ‘आदर्श’राव नांदेडकरही उधोजीराजेंच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून बुचकळ्यात पडतात, ‘ भिक्षां देही करायला जाणारा याचक इतका प्रसन्न कसा असू शकतो ?’ अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकते.ते कॉलेजमध्ये असताना त्यांच्या एका मित्राची प्रेयसी म्हणे त्याला सोबत घेऊन दुसऱ्या मुलाकडे नोट्स घायला जात असे. त्याला बाहेर उभा करून एकटीच त्या मुलाच्या घरात जात असे. नंतर त्यालाच टांग मारून ती त्या ‘नोट्सवाल्या’बरोबर पळून गेली म्हणे ! हा किस्सा आठवताच ‘आदर्श’रावांना त्या ऐसी गाडीतही दरदरून घाम फुटतो. घाम पुसता पुसताच त्यांना, ‘ दिल्लीतल्या हवेतच गद्दारी असते.’ हे कोणत्यातरी राजकिय विश्लेषकाने लिहिलेलं वाक्य आठवतं आणि त्यांचा हातरुमाल ओलाचिंब होऊन जातो. काहीही झालं तरी उधोजीराजेंना दिल्लीश्वरांशी एकांतात भेटू द्यायचं नाही असा निश्चय ते मनोमन करतात आणि समोरच्या आरश्यात उधोजीराजे दिसतील अशी पोझिशन घेऊन बसतात
उधोजीराजे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत दिल्लीश्वरांच्या दरबारात बसलेले आहेत. थोडयाच वेळात दिल्लीश्वरांचे आगमन होते. तिघे उठून नमस्कार करतात. दिल्लीश्वर इतर दोघांकडे दुर्लक्ष करत, उधोजीराजेंकडे पाहून स्मित करत प्रतिनमस्कर करतात. किराणा दुकानात गेल्यावर वाण सामानाची यादी दुकानदाराकडे द्यावी तशी एक यादी दिल्लीश्वरांच्या हातात दिली जाते.
उधोजीराजे -( दबक्या आवाजात) – ये हमारी कुछ मांगे है.
दिल्लीश्वर त्या यादीकडे न पाहताच ती खिशात ठेवून घेतात.
दिल्लीश्वर – ( उधोजीराजेंकडे पाहत) आमारी साथ नो तमारो संबंध घनो जुनो छे. निश्चितपने मदद करे छे.
घना दिवसो पछी मळ्या छे. घनी वातो करवानी छे.मारी साथे एकला अँटीचेंबरमा आवो.
उधोजीराजे इतर दोघांकडे न पाहताच अँटी चेंबरकडे धाव घेतात. ‘आदर्श’रावांना एकदम ‘नोट्स’वाली आठवते.
आत जाताच दिल्लीश्वर उधोजीराजेंना कमळाचं फुल देतात.
दिल्लीश्वर – (सूचक हसत) आज फ्रेंडशिप डे है. ले लो. राजकारनमा सामेल न होवाने कारन मित्रता कॅथी समाप्त थाय छे ?
उधोजीराजे सावधपणे इकडेतिकडे पाहत कोणी आपला फोटो तर काढत नाही ना याची खात्री करून फुल हातात घेतात आणि पट्टदिशी शेजारच्या फुलदाणीत खोचून देतात. समोर एका प्लेटमध्ये जलेबी आणि फापडा ठेवलेला असतो.
दिल्लीश्वर – ( तिकडे बोट दाखवत) लो. खाओ.
उधोजीराजे – (ओशाळत ) याची काय गरज होती ?
दिल्लीश्वर – ( मिश्किलपणे ) अरे , असा कसा बोलते ? जलेबी ने फाफडो , उधोजीराजे आपडो !
दोघेही खळखळून हसतात.
उधोजीराजे – (धीर एकवटून) एक विचारू का ?
दिल्लीश्वर – ( उधोजीराजेंच्या पाठीवर हात ठेवत ) पुछो पुछो, एक क्या दस पूछो. टांग मारी फिर भी यार तो यार होता है ना ?
उधोजीराजे – (ओशाळत ) कशाला लाजवता ? झाली चूक. भोगतोय. संधी मिळू द्या, लगेच चूक सुधारतो.
दिल्लीश्वर – मौका मिलता नही है उधोजीराजे, ढूंढना पड़ता है. आपके बाकी दोस्त भी ढूंढ रहे हैं, उनके पहले आप ढूंढ लो. नही तो, ‘अब पछताये तो क्या , जब चिड़िया चुग गयी खेत’ हो जाएगा. और राजनीतिमे आसपास चिड़िया नही गीदड़ होते हैं !समझे ?
उधोजीराजे – अच्छी तरह से समझ गया. आप सिर्फ वो ‘ करेक्ट कार्यक्रम’वाले को थोड़ा रोको.
दिल्लीश्वर – ( हसत)उसको रेड सिग्नल और आपको ग्रीन सिग्नल दे दिया है समझो.
उधोजीराजे अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने अँटी चेंबरमधून बाहेर येतात. बाहेर बसलेल्या दोघांना तर ते विसरूनच गेलेले असतात. पार्श्वभूमीवर गाण्याचे बोल ऐकू येत असतात –
खाली सलाम दुआ मुलाक़ात में




