Top Newsराजकारण

बंडातात्या कराडकर यांचे सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; माफी मागायलाही तयार !

मुंबई/सातारा : महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय. बंडातात्या कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान करतात. हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी. अन्यथा मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्या यांना जाब विचारावा, त्यांना चौकशीला बोलवावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कायंदे यांनी केलीय.

खा. नवनीत राणा यांनीही बंडातात्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. पण बंडातात्या कराडकर यांचे महिलांबाबतचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनीही बंडातात्यांवर जोरदार टीका केलीय. बंडातात्या कराडकर यांनी माफी मागावी. सुप्रिया सुळे या महिलांचं नेतृत्व करतात. त्यामुळे बंडातात्यांनी महिलांचा अपमान केलाय, त्यामुळे बंडातात्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक मागणी रुपाली पाटील यांनी केलीय.

माफी मागायला तयार, विषय आता संपवा : बंडातात्या

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांना फोन करुन माफी मागितल्याची माहिती मिळत आहे. तसंच आपल्या वक्तव्याचे माध्यमामध्ये जोरदार पडसाद उमटल्यानंतर आपण माफी मागायला तयार आहोत, पण आता हा विषय संपवा, असं बंडातात्या म्हणाले. मी फक्त एवढंच बोललो नाही. मात्र, माध्यमांमध्ये माझं तेवढंच वक्तव्य दाखवण्यात आलं. आपण चुकलो असू तर माफी मागण्यात कमीपणा नसतो, असं म्हणत बंडातात्या यांनी दिलगिरी व्यक्त केलीय

बंडातात्यांकडून ठाकरेंचं कौतुक, तर अजितदादांना टोला !

बंडातात्या कराडकर यांनी आज दोन वक्तव्य केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत बंडातात्या यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तर बंडातात्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आपल्या एका वक्तव्यातून जोरदार टोला लगावलाय. ‘ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीचा वापर करत त्यांनी अजितदादांना ढवळ्याची, तर उद्धव ठाकरे यांना पवळाची उपमा दिली आहे.

‘एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला… पुढं काय, वाण नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगला आहे ओ… उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे, असा एक हिंदुत्वाता पुरस्कर्ता, हिंदूहृदयसम्राट अशी ज्यांची पदवी होती, ज्यांना हिंदू समाजानं डोक्यावर घेतलं. असा एका हिंदुत्ववादी पुढाऱ्याचा मुलगा आहे उद्धव ठाकरे. अशी दारु आणावी, मंदिरं बंद करावी, सप्ते बंद करावे, वारी बंद करावी, अशा विचाराचा पुढारी नाही उद्धव ठाकरे. पण ते ढवळ्या शेजारी पवळा बांधला ना… ढवळा कोण तुमच्या लक्षात आलं असेल. अजितदादा ढवळा आणि त्याच्या शेजारी नेऊन हा पवळा बांधला, अशा शब्दात बंडातात्या कराडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लागावला आहे.

बंडातात्या यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल

बंडातात्या यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आता राज्य महिला आयोगाने घेतलं आहे. महिलाबाबतचं त्यांचं हे वक्कव्य खपवून घेतलं जाणार नाही. सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करावी. याचा अहवाल ४८ तासाच्या आत महिला आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा, असा आदेश रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची बदनामी थांबवा, किर्तनाने समाज सुधारत नसतो : शेट्टी

वाईनला किराणा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय योग्य आहे का? यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाईनचा विषय अनावश्यक चर्चेला आणून शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, वाईनला किराणा दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे केल्याने वाईनचा खप वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. किर्तनाने माणूस सुधारत नाही, ना तो लावणीने बिघडतो. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक हा विषय चर्चेमध्ये आणत आहे. मात्र या सर्वांमधून शेतकऱ्यांची नाहक बदनामी सुरू आहे, त्यामुळे हे सर्व वेळीच थांबायला पाहिजे.

बंडातात्या कराडकर हे वारकरी आहेत का?, जितेंद्र आव्हाडांचा सवाल

ज्येष्ठ किर्तनकार बंड्यातात्या कराडकर यांनी वादग्रस्त विधान केलं. या विधानावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. एका किर्तनकाराच्या तोंडून अशा प्रकारची भाषा येणं यामुळे तो किर्तनकार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. बंड्यातात्यांची मुळं कुठे आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे वागत आहेत. यात मनावर घेण्यासारखं काही नाही, असं आव्हाड यांनी नमूद केलं.

पंकजाताई असो किंवा सुप्रियाताई असो एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची किंवा वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते वारकरी आहेत की नाही हे तपासण्याची फार पूर्वीपासून गरज होती. मात्र त्यांना आता पुन्हा त्यांच्या वक्तव्यातून सिद्ध करुन दिलं की मी कोण आहे, अशा शब्दात आव्हाडांनी मार्मिक शब्दात टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button