राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक भूमिका घ्यावी : दरेकर

मुंबई : मनसेसोबत युती करण्याबाबत भाजप नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा ही चर्चाच असावी, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. त्यामुळे मनसे-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केलं आहे. पण या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील, असं दरेकर म्हणाले.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरही भाष्य केलं. ईडीच्या कारवाया सुरू आहेत. अनेक नेते अटकेच्या प्रतिक्षेत आहेत, असं विधान त्यांनी केलं आहे.




