
मुंबई – नवरात्रोत्सवाची चाहूल लागतातच दरवर्षी दांडियाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण होत असतो. बाजारपेठांमध्ये कपड्यांपासून दांडियांच्या खरेदीसाठी गर्दी होत असते. तर दांडिया प्रशिक्षण वर्गही जोशात सुरु असतात. मात्र कोविडचे संकट अद्याप कायम असल्याने यंदाही गरबा – दांडिया रास रंगणार नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सदेखील साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने गुरुवारी नियमावली जाहीर करीत गरबा – दांडियाचे आयोजन करण्यावर बंदी घातली आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला असला तरी अद्याप संसर्गाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत पार पडल्यानंतर आता नवरात्रोत्सवातही कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन मुंबईकरांना करावे लागणार आहे. नवरात्रोत्सवातील विशेष आकर्षण असलेल्या गरबा आणि दांडियाचे आयोजन झाल्यास लोकांची गर्दी होऊन संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी घटनास्थापना होणार आहे. मात्र गरबा सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबीरे घ्यावे, आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना पालिका प्रशासनाने केली आहे.
घरगुती देवीमूर्तीचे आगमन – विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये. अगमनासाठी जास्तीतजास्त पाच व्यक्तींचा समूह तर विसर्जनाच्यावेळी दहापेक्षा अधिक लोकं असू नयेत. त्यांनी मास्क, शिल्ड स्वसंरक्षणाची साधने वापरावीत, सामाजिक अंतर पाळावे. लसीकरणचे दोन डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत. घरी विसर्जन करता येणे शक्य नसल्यास नजिकच्या नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करावे. मात्र गर्दी टाळावी, अशी सूचना पालिकेने केली आहे.
गणेशोत्सवात ऑनलाईन दर्शनावर भर देण्यात आला होता. नवरात्रोत्सवात मंडपांमध्ये निर्जतुकीकरण, थर्मल स्क्रीनींगची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सींग, स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक असेल. मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीनवेळा निर्जतुकीकरण करावे, अशी सूचना केली आहे. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले व हार अर्पण करणे शक्यतो टाळावे.
असे आहेत इतर नियम…
– देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती मूर्तीकरिता दोन फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
– शक्यतो व्यावसायिक जाहिराती करु नयेत.
– मंडपाच्या परिसरात, त्या लगतच्या रस्त्यांवर फुले, हार, प्रसाद विक्रीसाठी स्टॉल, दुकाने लावू नयेत.
– मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करावेत * नवरात्रौत्सवादरम्यान धार्मिक, भक्तीपर अशा गर्दी जमा होणा-या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे.
– मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत, याची खबरदारी घ्यावी.
– देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहापेक्षा जास्त कार्यकर्ते, भाविक उपस्थित असू नयेत.
– लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
– नैसर्गिक विसर्जन स्थळी नागरिकांनी मूर्त्या पालिकेच्या संकलन कक्षाकडे जमा कराव्यात.
– नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोन मध्ये असल्यास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मुर्तीचे विसर्जन करावे.
– उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ व भा.द.वि. १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.