राजकारण

सुप्रीम कोर्टाने फटकारताच मोदी सरकारला जाग; बाळासाहेब थोरातांचा टोला

मुंबई : देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना २१ जूनपासून कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. त्याचबरोबर लसीकरणाची सर्व जबाबदारी आता केंद्र सरकारने घेतली आहे. याबाबत काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदींना जोरदार टोला हाणलाय. पंतप्रधान मोदी यांनी अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. त्यांचा हा निर्णय चांगला आहे पण तो घेण्यास उशीर झाला. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहिलेल्या मोदी सरकारला सुप्रीम कोर्टानं धारेवर धरून लसीकरण मोहिमेची सर्व माहिती मागवताच केंद्र सरकारला जाग आली. त्यामुळे आज केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

देशात आतापर्यंत ज्या लसीकरण मोहिमा झाल्या त्यांची जबाबदारी केंद्र सरकारांनीच घेतली होती. पण मोदी सरकारने आपली जबाबदारी राज्यांवर ढकलून पळ काढला होता. काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला. देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांवर टीका होऊ लागली आणि सुप्रिम कोर्टाने फटकारल्यावर आता नाईलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. आता केंद्राने जबाबदारी घेतलीच आहे तर ती नीट पार पाडावी. केंद्र सरकारवर टीका करताना थोरात यांनी अशी अपेक्षाही व्यक्त केलीय.

कोर्टानं फटकारे दिल्यानंतर राज्यांवर लसीकरण सोडणं हे केंद्र सरकारला महागात पडणार हे दिसतच होतं. मोदींनी हुशारीने आपले अपयश लपवण्यासाठी राज्यांची विनंती आहे, राज्य सरकारे आता असमर्थ ठरत आहेत, पुर्नविचारांची मागणी करत आहेत, असं म्हणत सोयीस्करपणे बगल दिली. पण महाराष्ट्र सरकारने मात्र लसीकरणाची जबाबदारी घेऊन एकरकमी पैसे देऊन राज्यातील जनतेला लस देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळेच लसीकरण मोहिमेला गती येत नव्हती. केंद्र सरकारला उशिरा शहाणपण आले आहे, अशी टीकाही थोरात यांनी केलीय.

त्याचबरोबर कोविन या अ‍ॅप्लिकेशनमध्ये अजूनही अडचणी आहेत, जिल्हा ओलांडून लोक लसीकरण करून घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष तयार होतो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे या त्रुटी दूर करून केंद्राने लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणावी, महाराष्ट्र सरकार त्यासाठी केंद्राला पूर्ण क्षमतेने मदत करेल, असंही थोरात यांनी म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button