सोलापूर : दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात सांगितले. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. राणेंनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. दरम्यान, दिशा सालियन संदर्भात काही पुरावे असल्यास यंत्रणांना द्या मात्र मृत्यूनंतर तिची होत असेलेली बदनामी टाळा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, दिशा सालियनच्या मृत्यूबाबत कोणत्याही नेत्याचा संबंध नाही याची आम्हाला खात्री आहे. मात्र तिच्या मृत्यूबाबत तिची बदनामी करणे सुरु आहे. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हे चांगले नाही. कोणतेही पुरावे असतील तर आरोप करणाऱ्यांनाही तपास यंत्रणाना पुरावे द्यावेत. उगाच पत्रकार परिषद घेऊन तिची बदनामी टाळावी, असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांना दिला.
येत्या विधानसभेत १०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणार !
येत्या विधानसभा निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा निवडूण आणू असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आम्ही गेल्या विधानसभेला काँग्रेससोबत आघाडी केली होती. तेव्हा आम्ही ११४ जागा लढवल्या होत्या. यावेळी देखील आमचे पहिले प्राधान्य हे आघाडीलाच असणार आहे. आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील तेवढ्या आम्ही निवडून आणू असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आघाडीमध्ये आमच्या वाट्याला किती जागा येतील ते बघावे लागेल, मात्र जिथे आम्हाला संधी मिळेल तेथील प्रत्येक उमेदवार विजयी होईलच असा आमचा प्रयत्न असल्ययाचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात खालच्या स्थरावर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विशेष: यामध्ये भाजप आणि शिवसेना आघाडीवर आहेत. यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया येत असते. भाजप ज्या भाषेत बोलत आहे किंवा त्यांना जी भाषा कळते त्यात उत्तर द्यावे लागेल. समोरच्याला समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची काही लोकांची पद्धत असते. त्यामुळे याबाबत कोणाचेही समर्थन करता येणार नसल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे.