कृषीमंत्र्यांच्या मुलाचे ठाण्याच्या शिवसेना खासदार कन्येशी ‘गुपचूप लगीन’!

मालेगाव : अविष्कार दादाजी भुसे आणि लतीशा राजन विचारे मालेगावमधील आनंद फार्म येथे विवाह बंधनात अडकले. या विवाह सोहळ्याविषयी अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. ‘मोजक्या’ नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘नो एन्ट्री’ होती. मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता.
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी विवाह सोहळा नुकताच पार पडला. या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मालेगावात ज्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा झाला, त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगीशिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला होता.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र विशेष अतिथी आणि त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली. राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. पोलीस आणि सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता पाहायला मिळाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिला. अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला.




