इतर

सचिन वाझेच्या बँक खात्यात दीड कोटी; अँटिलिया स्फोटके कटात हिरनचा सहभाग!

एनआयए कोर्टात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांचा दावा

मुंबई: सचिन वाझे याच्या बँक खात्यात दीड कोटी रुपये आहेत. सहायक पोलीस निरीक्ष (एपीआय) श्रेणीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडे इतके पैसे कुठून व कसे आले. हे पैसे खंडणी वसूल करून कमावलेले आहेत का, या साऱ्याची कसून चौकशी करायची आहे, असे म्हणणे आज एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी एनआयए कोर्टात मांडले.

मनसुख हिरन हे स्वतःही अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या जिलेटीन कांड्याच्या कटात सहभागी होते. नंतर अन्य आरोपींनी मिळून मनसुख हिरन यांच्या हत्येचा कट २ व ३ मार्च रोजी रचला, असा गंभीर दावाही एनआयएतर्फे कोर्टात करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची एनआयए कोठडी वाढवून मागण्यात आली असता ती मागणी कोर्टाने मान्य केली.

दरम्यान, सचिन वाझे यांनी आज एनआयए कोर्टात स्वत:च्या हाताने लिहिलेलं पत्र सादर करण्याचा प्रयत्न केला मात्र हे पत्र नोंदीवर घेण्यास नकार देतानाच आपले लेखी म्हणणे कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच मांडावे, असे आदेश कोर्टाने दिले. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले असून त्यात वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात देशमुख यांच्यावर जे आरोप केले होते तशाच प्रकारचे आरोप वाझे यांनी या पत्रात केले आहेत. अनिल परब यांनी भेंडी बाजार येथील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टींना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले होते, असा दावाही वाझे यांनी पत्रात केलेला आहे. या पत्राने मोठी खळबळ माजली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button