राजकारण

काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात कंटाळलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा काढता पाय !

दुपारच्या कार्यक्रमाला नाना पटोले पोहोचले थेट रात्री

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं राज्यभरात कार्यकर्ता मेळावा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कार्यक्रम सुरु होण्यास तब्बल पाच तासांचा उशीर झाल्यानं स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. त्याचं झालं असं की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जाणार होता. त्यासाठी दुपारी १२ पासून स्वातंत्र्यसैनिक कार्यक्रमस्थळी हजर झाले होते. मात्र, दुपारी ३ वाजता सुरु होणाऱ्या कार्यक्रमासाठी नाना पटोले रात्री ८ पर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेले!

नाना पटोले यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाीच स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वागत होताच नाना पटोले यांची वाट न पाहता वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक निघून गेले. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना नियम धाब्यावर बसवल्याचं दिसून आलं. कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं, तर नाना पटोलेंसह अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हता. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांकडूनच कोरोना नियमावली पायदळी तुटवली जात असल्याचं चित्र औरंगाबादेत पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button