
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचा स्वातंत्र्य दिवसाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा ‘फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस’ म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहीणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, फाळणीमध्ये विस्थापित व्हावे लागलेल्या आणि प्राण गमावलेल्या आमच्या लाखो बंधु-बहीणींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी आजचा दिवस ‘फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस’ म्हणून मानला जाईल. आजचा हा दिवस, #PartitionHorrorsRemembranceDay आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही, तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावने आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे, असे मोदी म्हणाले.
#PartitionHorrorsRemembranceDay का यह दिन हमें भेदभाव, वैमनस्य और दुर्भावना के जहर को खत्म करने के लिए न केवल प्रेरित करेगा, बल्कि इससे एकता, सामाजिक सद्भाव और मानवीय संवेदनाएं भी मजबूत होंगी।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र, इंग्रजांनी भारताला या स्वातंत्र्याचा आनंद फाळणीची मोठी किंमत मोजून दिले होते. १४ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान दोन भागात विभागले गेले होते. १५ ऑगस्टला सकाळी ट्रेनमधून, घोडे-खेचरांवरून आणि पायी लोक आपल्या मातृभूमीतून दुसऱ्या देशात जात होते. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या या लोकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले होते.
फाळणीवेळी दोन्ही बाजुला हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही रिपोर्टनुसार ही संख्या १० ते २० लाख एवढी होती. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध सर्वच होरपळले गेले. १४ ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात यापुढे हा दिवस ‘फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे.