अतुल भातखळकर यांचे श्रीमंत कोकाटेंवर टीकास्त्र
मुंबई: नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. कोकाटे यांच्या या दाव्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. हे श्रीमंत कोकोटे नाहीतर तर भंपक पेकाटे आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. बाकी विचाराल तर रामायण काल्पनिक… मात्र नाशिक वर पहिला हक्क शूर्पणखेचा… ‘भम्पक पेकाटे’, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडले. यावेळी एका परिसंवादात बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी हे विधान केलं होतं. शूर्पणखा ही गोदा खोऱ्यातील देवी आहे. आजच्या नाशिकमध्ये तिचे वास्तव्य होते. त्याचे पुरावे आहेत. नाशिकच्या पायाभरणीत तिचा वाटा आहे. त्यामुळे नाशिक शहरावर शूर्पणखेचा पहिला अधिकार आहे, असं श्रीमंत कोकाटे म्हणाले. यावेळी त्यांनी नाशिकच्या नामांतराची मागणीही केली. नाशिक शहराची खरी ओळख लपवली जात आहे. त्यामुळे नाशिकला ‘शूर्पणखा नगरी’ असं नाव द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
बाकी विचाराल तर रामायण काल्पनिक… मात्र नाशिक वर पहिला हक्क शूर्पणखेचा… 'भम्पक पेकाटे' pic.twitter.com/ADGCfqOPGi
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 7, 2021
यावेळी त्यांनी पेशव्यांवरही टीका केली. पेशा हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत, असं ते म्हणाले. पेशवे काळातच महिलांचा छळ झाला होता. कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात असत. कर मिळेपर्यंत शेतकऱ्यांना मारहाण केली जाई, असा दावाही कोकाटे यांनी केला.
यावेळी त्यांनी महात्मा फुले हेच पहिले शिवशाहीर असल्याचा दावा केला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्व प्रथम शोधून काढली. त्यांनीच 908 ओळींचा पोवाडा शिवरायांवर लिहिला. त्यामुळे तेच पहिले आणि खरे शिवशाहीर आहेत, असं त्यांनी सांगितलं. महात्मा फुलेंनी अन्यायाविरोधात लढा देऊन ज्ञान गंगा घरोघरी नेली, असंही त्यांनी सांगितलं.