एसीमध्ये बसून राज्यात जमावबंदीचे आदेश काढू नका : प्रवीण दरेकर
नाशिक: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून येत्या 15 एप्रिलपर्यंत राज्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी सर्व काही आम्हाला हवं आहे. परंतु तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम करू नका, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला सुनावले आहे.
प्रवीण दरेकर यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. जुलमी पद्धतीने कामकाज करता येणार नाही. लॉकडाऊन, संचारबंदी सर्व आम्हाला हवं आहे. मात्र तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम करू नका, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
अशा प्रकारच्या निर्णयामुळे लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीत नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्हाला वाटलं म्हणून एसीमध्ये बसून जीआर काढला, असं होता कामा नये, लॉकडाऊन किंवा संचारबंदी करताना लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, असं दरेकर म्हणाले.