अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले, सचिव मंडळी हे राज्य चालवतात का?

मुंबई – एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? असा सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे, असे मंत्री वडेट्टीवार म्हणतात. याचा अर्थ राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत एवढं हे दुबळं सरकार आहे असाच होतो.
दरम्यान, शरजिल उस्मानी हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याच्या घटनेवरूनही भातखळकर यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले, अशी टीका भातखळकर यांनी लगावला आहे. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला.