नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवू शकतो. भाजपा आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पडद्यामागून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याचं सांगितले जात आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. खात्रीलायक वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस यांना मोदी सरकारमध्ये स्थान देऊन दिल्लीला बोलावलं जाऊ शकतं. त्यानंतर भाजपा-शिवसेना एकत्र येत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील आणि भाजपाचे २ उपमुख्यमंत्री बनवतील असं सांगण्यात आलं आहे.
परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा महाराष्ट्रातील राजकारणाशी काहीही संबंध नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार नाहीत तोपर्यंत शिवसेनेसोबत कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा नाही. पक्ष नेतृत्वाबाबत तडजोडीला तयार नाही. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या दुप्पट जागा जिंकल्या आहेत असं भाजपातील काही सूत्रांचे म्हणणं आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. तर दुसरीकडे फडणवीसांनीही ही चर्चा फेटाळून लावली आहे. ते महाराष्ट्रातच राहतील. भाजपात कोणता निर्णय घ्यायचा ते पंतप्रधान ठरवतात. ते जे काही ठरवतील ते सगळ्यांनाच मान्य करावं लागतं. पक्षाने मला विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली आहे. ती मी निभावत आहे. मला दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. पक्ष याबाबत निर्णय घेईल असं फडणवीसांनी सांगितले आहे.
परंतु भाजपमधील सूत्र सांगतात की, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना शिवसेना-भाजपाने एकत्र यावं असं वाटतं. शिवसेना-भाजपा यांची युती होऊ शकते. अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्ष वेगळे झाले. ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, आम्ही भारत-पाकिस्तानसारखे नाही, आमचं नातं आमिर खान आणि किरण रावसारखं आहे. म्हणजे शिवसेना-भाजपाचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. परंतु मैत्री कायम आहे. त्याचसोबत शिवसेनेतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर पुन्हा भाजपाच्या नेतृत्वावर भरवसा ठेऊ शकतो का? सध्या शिवसेनेचं प्राधान्य आगामी मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांवर आहे. पुढील वर्षी राज्यात १० महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जर शिवसेना-भाजपात युती झाली नाही तर दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे.