राजकारण

भारत विकासाच्या मार्गावर असताना अश्रद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न : मोहन भागवत

नागपूर : स्वातंत्र्य भेदरहित समाजातूनच टिकू शकते. सनातन काळापासून एकात्मता ही भारताची शक्ती आहे. भारत विकासाच्या मार्गावर जात असताना इतिहास, व्यवस्था, वर्तमानाची निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न करत आहेत. प्राचीन मूल्यांवर हल्ला होतो. निंदा केली जाते व सूक्ष्म माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. अशा लोकांनी आता हातमिळावणीदेखील केली आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

संघाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. मोहन भागवत पुढे म्हणाले की, भारतातील दोन राज्यांतील पोलीस एकमेकांशी युद्ध करतात हे अयोग्य आहे. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत ना..मग असले प्रकार का? संविधानाअंतर्गत आपण सर्वच एकाच देशाचे आहोत. व्यवस्था फेडरल असली तरी लोक फेडरल नाही. सत्तेत बसलेल्या लोकांकडून पोषक व्यवहार होत नाही, मग समाजाला दिशा कशी मिळणार? राजकारणातील स्वार्थासाठी काही लोक कपट करतात. असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न होतात. जाती, प्रदेश, भाषेच्या माध्यमातून देशात अराजकता उत्पन्न करण्याचे प्रयत्न होतात. तंत्रज्ञानाचा आधार घेत आगीत तेल ओतण्याचे काम होतं. ओटीटीवर कसे कसे चित्रपट येतात. आता तर मुलांच्या हातीदेखील मोबाईल आले आहे. ओटीटीवर नियंत्रण नाही. देशात अमली पदार्थाचे जाळे वाढत आहे. त्यावर नियंत्रण नाही. त्यातून येणाऱ्या पैशांतून देशविरोधी कारवाया होतात. बिटकॉईनवर कोणत्या राष्ट्राचे नियंत्रण आहे. समाजहितासाठी या बाबींना नियंत्रित करण्याचे काम शासनाला करावेच लागेल असं त्यांनी सांगितले.

तसेच फाळणीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. नवीन पिढीपर्यंत सत्य पोहोचायला पाहिजे. व्यवस्थेसोबतच लोकांचे मन बदलण्याचे प्रयत्न झाले तरच जातीभेद दूर होईल. समाजातील भेद वाढविण्याची भाषा वापरायला नको. लोकांना एकत्र जोडण्याची भाषा हवी व संवाद सकारात्मक असला पाहिजे. मंदिर, पाणी, स्मशान एकच असायला हवे. सामाजिक समरसता व्हायलाच हवी. मनातून भेद जाण्यासाठी संवाद व्हायला हवा. अनौपचारिक चर्चा हवा. जयंती, पुण्यतिथी, विशेष उत्सव एकत्रित मिळून झाले पाहिजे असंही मोहन भागवत यांनी सांगितले.

कोरोनामुळे नुकसान झाले. अनेक तरुण गेले. लोकांनी एकत्रित येत कोरोनाचा सामना व प्रतिकार केला. तिसऱ्या लाटेसाठीदेखील प्रतिकार सुरू आहे. ही लाट येणार नाही असे वाटते. जर आलीच तर परिणामकारक राहणार नाही. प्रत्येक गावात पाच ते सात कोरोनायोद्धा तयार व्हावे यासाठी संघाने देशपातळीवर प्रशिक्षण दिले आहे. देश नक्कीच कोरोनाला मात देईल. कोरोनामुळे आर्थिक क्षेत्रात नुकसान झाले आहे. परंतु लोकांमध्ये आर्थिक नुकसान भरून काढण्याचा आत्मविश्वास आहे असंही मोहन भागवत यांनी सांगितले.

अनेक खर्च आपण उगाच करतो. कोरोनात कमी पैशांत विवाह झाले. कोरोना जायच्या मार्गावर आहे. सुधारलेल्या सवयी परत बिघडवू नका. पर्यावरण, आरोग्य यावर भर द्यायला हवा. सर्व प्रकारच्या पॅथींना मान्यता मिळाली पाहिजे. पॅथीचा अहंकार असायला नको. मतभेद असावेत परंतु विरोध नको. सर्व आरोग्य पद्धतींचा समन्वय साधत सर्वसमावेशक उपचारपद्धती तयार व्हावी. गावपातळीवर आरोग्यरक्षकांची व्यवस्था बनावी. सर्वांना सुलभ व स्वस्त आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी असं त्यांनी सांगितले.

हिंदू समाजाच्या मंदिरांची स्थिती फारशी चांगली नाही. दक्षिणेतील मोठी मंदिरे सरकारच्या अखत्यारित आहेत. सरकारच्या अखत्यारित असलेले काही मंदिर खूप चांगले चालतात. भक्तांच्या अखत्यारित असलेले मंदिरदेखील उत्तम चालतात व समाजसेवादेखील करतात. जेथे असे नाही तेथे लूट सुरू आहे. हिंदू मंदिरांची संपत्ती अहिंदूंसाठी दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयदेखील आहे की मंदिराचे मालक देव असून पुजारी व्यवस्थापक आहे. सरकार काही काळच मंदिरांचे व्यवस्थापन चालवू शकते. नंतर ती परत द्यावी. याबाबत विचार व्हायला हवा. हिंदूंना जागृत करायला हवे असं आवाहनही मोहन भागतव यांनी दसरा मेळाव्यात केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button