माॅस्काे/कीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या १० दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशिया सैन्याने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक महत्वाची शहरं उद्ध्वस्त केली आहेत. तसेच युक्रेनचे लष्करी तळ, अणु ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले चढवले आहेत. प्रचंड विध्वंस होऊनही दोन्ही देशांमधील युद्ध थांबताना दिसत नाही. अशातच रशियाकडून वारंवार युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरु आहेत. शनिवारी राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या घराजवळ रॉकेटचे काही भाग आढळून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती निवास स्थानाला मिसाईल हल्ल्याने उडवून देण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे म्हटले जातेय. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितनाही झालेली नाही तसेच राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचेही नुकसान न झाल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी स्वत: या मिसाईल हल्ल्याची माहिती दिली आहे. रशियाला राष्ट्रपती भवनावर हल्ला करायचा होता मात्र निशाणा चुकला. यापूर्वी देखील रशियाने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने कट रचून तीन वेळा झेलेन्स्की यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र यातून ते सुखरूप वाचले अशी माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेन सोडून पळून गेल्याचा दावा रशियाकडून केला जातोय. युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन सोडून पोलंडला आश्रय घेतल्याचे वृत्त रशियातील सरकारी वृत्तवाहिनी स्पुतनिकने केलाय. मात्र युक्रेनने हा दावा फेटाळला आहे. झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडला नसून ते अद्याप आपल्या देशात असल्याचे युक्रेनकडून सांगितले जातेय.
युक्रेनची अणुभट्टी थोडक्यात बचावली
रशियन सैन्याने जपाेजिरिया अणू ऊर्जा प्रकल्पाचा ताबा घेतला आहे. हा युराेपमधील सर्वांत माेठा अणू ऊर्जा प्रकल्प आहे. रशियाने प्रकल्पावर क्षेपणास्त्राने हल्ला केला; मात्र सुदैवाने ते अणुभट्टीवर पडले नाही. त्यामुळे भीषण अणूअपघात टळला. या घटनेमुळे युराेपची चिंता वाढली आहे.
युक्रेनवर हल्ल्याच्या नवव्या दिवशी रशियाने चर्निहिव्हवर जाेरदार बाॅम्बहल्ला केला असून, गेल्या २४ तासांमध्ये तेथे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र जपाेजिरिया प्रकल्पावर रशियाने क्षेपणास्त्राने हल्ला चढविल्यामुळे युराेपला धडकी भरली हाेती. रशियाच्या हल्ल्यात प्रकल्पाच्या सुरक्षेतील ३ सैनिकांचा मृत्यू झाला. रशियन क्षेपणास्त्र प्रशिक्षण केंद्रावर पडले.
ते अणुभट्टीवर काेसळले असते, तर चेर्नाेबिलपेक्षा १० पट माेठ्या घटनेचा धाेका हाेता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी रशियन अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केल्यानंतर आपत्कालीन पथकाला जपाेरिजिया प्रकल्पात जाण्याची परवानगी देण्यात आली. सद्य:स्थितीत किरणोत्सर्गाची पातळी वाढल्याचे संकेत नाहीत. प्रकल्पातील आग विझविण्यात आली आहे, असे तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा प्रकल्प निपर नदीजवळ असून, चेर्नाेबिलपेक्षा १० पट माेठा आहे. रशियन सैन्याने सकाळपासून त्यावर हल्ला चढविला हाेता. याठिकाणी ६ अणुभट्ट्या आहेत. त्यापैकी १ अणुभट्टी सध्या ६० टक्के क्षमतेवर सुरू आहे. हे शहर रशियाच्या ताब्यात गेल्यास युक्रेनची माेठी आर्थिक काेंडी हाेण्याची शक्यता आहे.
रशियन सैन्याने कीव्हला वेढा दिला आहे. मात्र, कीव्ह ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात रशियाचे एक प्रमुख लष्करी अधिकारी मेजर जनरल आंद्रेई सुखाेवत्स्की यांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. रशियाने अधिकृतरीत्या अद्याप याबाबत माहिती जाहीर केलेली नाही; परंतु सुखाेवत्स्की यांची युक्रेनी स्नायपरने हत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जेलेन्स्की पोलंडमध्ये पळून गेले : रशिया
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे पोलंडमध्ये पळून गेल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केेलेली नाही. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाचा मुकाबला करण्याचा निर्धार जेलेन्स्की यांनी व्यक्त केला होता. रशियाच्या दाव्यावर युक्रेनमधील असंख्य लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत.
कीव्हमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थी जखमी
कीव्ह येथून कारने दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात असलेला हरजोतसिंग हा भारतीय विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या छातीत, खांद्यात व गुडघ्यात गोळी लागली आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. हरजोतवर झालेला गोळीबार रशिया की युक्रेनच्या सैनिकांनी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हरजोतसिंग मूळ दिल्लीचा रहिवासी असून, त्याच्या जिवाला असलेला धोका आता टळला आहे.
युनोच्या मतदानाला भारत अनुपस्थित
युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आयोग स्थापन करण्याच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीच्या बैठकीत शुक्रवारी झालेल्या मतदानाला भारत अनुपस्थित राहिला. या ठरावाच्या बाजूने ३२ देशांनी मतदान केले. ठरावाच्या विरोधात रशिया व एरिट्रिया या दोन देशांनी मतदान केले, तर भारत, चीन, पाकिस्तान, सुदान, व्हेनेझुएला यांच्यासह तेरा देश मतदानाला अनुपस्थित राहिले.