संघ प्रणालीवर नख लावण्याचं काम तर खपवून घेणार नाही : आशिष शेलार
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला. दसरा मेळाव्यातील या भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवरुन भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या याच टीकेवर आशिष शेलारांनी पलटवार दिला.
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशीच आज बाबासाहेबांच्या संविधानावर प्रश्न उपस्थित केला. भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलात तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला. राज्याच्या प्रमुखांनी सुद्धा अशी भाषा वापरावी याचा आम्ही निषेध करतोय, असं शेलार म्हणाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिशा देण्याचे काम केलं पाहिजे. पण त्यांची दिशा चुकल्याने षण्मुखानंद हॉलमध्ये दशावतार सुरु होता. सकाळी आरएसएसचा जो कार्यक्रम झाला ती विचारांची श्रीमंती होती आणि संध्याकाळी जे झालं ते उसनवारी होती. समोर बसलेले शिट्ट्या मारतात की नाही हे बघत होते, असा टोला शेलारांनी लगावला.
ना विचार, ना धारा, ना धग असा हा शिवसेनेचा दसरा मेळावा. आजचा मेळावा म्हणजे वातानुकूलित उसनवारी. आधीच भीती होती म्हणून चिरकण्याची भाषा त्यांनी केली. संघ राज्य पद्धतीवर नख लावली जातायत. डंख लावला जातोय. जी भाषा तुकडे-तुकडे गॅंगची आहे तीच भाषा आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणात होती की काय? असा आजचा त्यांचा सूर होता, असा घणाघात शेलारांनी केला.
देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी आणि हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी उपरेपण चालतील. पण हिंदुत्व आणि देशाच्या एकतेच्या विरोधात टपोरी चालणार नाहीत. ज्यांचं हिंदुत्व आणि रंग शालीचा आहे त्यांनी कातडी भगवी असलेल्यांना शिकवू नये. आमची कातडीही भगवी आणि आत्माही भगवा आहे, असं शेलार ठणाकावून म्हणाले.
तुमच्या बोज्याने जे सरकार पडणार आहे ते आम्ही कशाला पाडू? सरकार चालवून दाखवा. बंदी उठवून दाखवा. शेतकऱ्यांना मदत करून दाखवा. विद्यार्थ्यांना मदत करून दाखवा. जोडशब्द करण्याचे प्रयत्न, कोट्या करण्याच्या पलीकडे काहीतरी करून दाखवा. जे ठरलं जे पक्षाने सांगितलं त्यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती. असत्याची आणि खोट्याची भूमिका शिवसेनेची होती, असं प्रत्युत्तर आशिष शेलारांनी दिलं.
राज्यात गणेशोत्सवाला बंदी, हिंदू सणांना बंदी. नवरात्रीतला गरबा बंद असे नियम घालून तुमचं हिंदुत्व तुम्ही दाखवून दिलंत. मुंबई महापालिका निवडणुकीत आता सालट काढून दाखवू. सावरकर समलैंगिक होते, असं म्हणणाऱ्यांच्या सोबत तुम्ही बसलात. त्यांची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही घालून पाडून बोलणार नाहीत. महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे, असं आशिष शेलार म्हणाले.