राजकारण

नालेसफाईवरुन आशिष शेलारांचे मुंबई महापालिकेवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : राज्यात मान्सून दाखल झालाय. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईची होणारी दैना सर्वांनाच माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मुंबईतील नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी शेलार यांना नालेसफाईच्या कामांवर मुंबई महापालिकेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबई शहरातील १०७ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नालेसफाई नाही, तर हातसफाई केली आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यावर केलीय.

मुंबईत नालेसफाई झालीच नाही. नाल्यात गाळ रुतलेला आहे. गाळाची बेटं तयार झाली आहेत. नाल्यावर शेती करावी अशी झाडं-झुडपं अभी आहेत. १०० टक्के नालेसफाईचा दावा हा बिलं काढण्यासाठी आहे. मुंबईच्या नालेसफाईत आता कट आणि कमिशन दोन्ही सुरु झालं आहे. यात प्रशासनाचे अधिकारीही जबाबदार आहे. पी. वेलारासू नावाचा राक्षस पालिका अधिकारी म्हणून फिरत आहे. तो आ वासून स्वत:ची वाहवा करत आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचं त्याला समर्थन आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय. तसंच यांना मुंबईकरांसमोर उघडं करणं हे भाजपचं काम असल्याचं शेलार म्हणालेत. मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ खेळत असल्याची टीका शेलार यांनी केलीय. दरवर्षी नालेसफाई होतच नाही, परंतु पैसे काढले जातात. कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

इतके दिवस महापौर कार्यालयात बसून नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना भाजपाच्या नालेसफाई पाहणीनंतर जाग आली आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच तत्काळ नालेसफाईसाठी दौरा आखला असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. त्याचबरोबर गजधरबंध, पीएनटी नाला, पोईसर नदी, जनकल्याण नगर नाला, वळनाई नाला, सोमैया नाला, जिजामाता नगर माहुल नाला हे सर्व नाले अद्याप गाळ, दगडमाती यांनी भरलेले आहेत.

निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button