मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत, अशी टिप्पणी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली.
खा. राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पंतप्रधानांचा महाराष्ट्राशी भेदभाव का?; राष्ट्रवादीचा सवाल
तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचं वादळ सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून आता राष्ट्रवादीने टीका केली आहे. महाराष्ट्रालाही तौक्ते वादळाचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का?, असा सवाल मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्रासाठी मोदींना वेळ नाही : पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा, गुजरातला जात आहेत. त्यांना तिकडे जायला वेळ आहे. पण महाराष्ट्रात येत नाहीत, अशी टीका करतानाच नियम शिथील करून कोकण किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रातही वादळ आलं आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रातही आलं पाहिजे, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकणात
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.