देवेंद्र फडणवीस हेच आभासी; शिवसेनेचा सणसणीत पलटवार
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये कोरोनासंदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप केला आहे. पण आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस हेच आता आभासी झाले आहेत, अशी खोचक टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची ९ मे रोजी बैठक घेतली. याविषयी बोलताना सावंत यांनी वरील वक्तव्य केले.
यावेळी अरविंद सावंत यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी मुंबईमध्ये कोरोनाच्या स्थितीसंदर्भात आभासी चित्र रंगवले जात आहे, अशी टीका केलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. तसेच दुसरकीकडे देशातील सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा राज्याची आणि मुंबईच्या कामाची दखल घेतलीय. देवेंद्र फडणवीस हेच आता आभासी झाले आहेत, असे अरविंद सावंत म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, आता तिसरी लाटसुद्धा येणार असल्याचे भाकीत केले जातेय. त्यामुळे राज्यात आणखी काळजी घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. याविषयी अरविंद सावंत यांनी सविस्तर माहिती दिली. याविषयी बोलताना “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात जनतेला कसा मदत करावी याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शन केलं. तिसरी लाट येत आहे. यामध्ये लहान मुलंसुद्धा करोनाच्या संकटात बाधित होऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात योग्य ती काळजी आणि खबरदारी आवश्य करा, असा सल्ला मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिलाय,” असे सावंत म्हणाले.