परमबीर सिंग यांना आता दिसताच क्षणी अटक ?
मुंबई : १०० कोटी वसुलीची लेटरबॉम्ब टाकून फरार झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांचे गुन्हे गंभीर असून त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर ही नोटीस जारी झाली तर परमबीर सिंग यांना दिसता क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आता परमबीर सिंग यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच राज्य गृह विभाग केंद्रीय गृह विभागाकडे याबद्दल मागणी करणार आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी झाली तर त्यांना दिसताच क्षणी अटक केलं जाईल. या कारवाईच्या दिशेने राज्य पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाणे न्यायालयाने परमबीर सिंगांविरोधात अ-जामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. किला कोर्टाने ही सिंग यांच्या विरोधात अ जामिनपात्र वॉरंट जारी करावे अशी मागणी पोलिसांनी केली आहे. राज्य पोलिसांच्या मते परमबीर यांचा गुन्हा गंभीर आहे. त्यात परमबीर सिंग हे चौकशी समितीलाही सहकार्य करत नाही. ते कुठे आहे याचा थांगपत्ताही लागत नाही. त्यामुळे आता पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर स्टेट सीआयडीने दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे. नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे. आज दोघांना किला कोर्टात हजर केले. सरकारी पक्षाने दोघांची ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या दोघांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली.
सरकारी वकिलांने कोर्टात माहिती दिली की, या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेण्याकरता हवालाचा वापर केला. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता. हवाला ॲापरेटर मोमिन याच्या माध्यमातून व्यवहार हा व्यवहार झाला. १० रुपयांची नोट ५० लाख रुपयांच्या हवाला व्यवहाराचा कोड होती. पीआय आशा कोरके यांनी हवाला मार्फत पैसे घेतले होते. पैशांची देवाणघेवाण होताना चॅटिंगद्वारे कन्फर्मेशन दिले होते. सरकारी वकिलांनी आता परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामिन पात्र वॉरंटची मागणी केली आहे.