Top Newsराजकारण

अमित शाह, मनोज नरवणेंना अटक करा; पाकिस्तान-तुर्कस्तानची ब्रिटनकडे मागणी

लंडन: काश्मीर प्रश्नी सातत्यानं तोंडावर आपटणाऱ्या पाकिस्तान आता तुर्कस्तानच्या मदतीनं भारताविरोधात नवी चाल खेळला आहे. काश्मीरमधील कथित युद्धगुन्ह्यांसाठी भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करण्याची मागणी लंडनमध्ये असलेल्या एका लॉ फर्मनं केली आहे. ही फर्म तुर्कस्तानशी संबंधित आहे.

काश्मीरमध्ये वास्तव्यास असलेल्या २ हजार लोकांचा जबाब असलेला एक अहवाल लॉ फर्मनं लंडन पोलिसांना दिला आहे. काश्मीरमधील नागरिकांनी दिलेले जबाब तिथे सुरू असलेल्या युद्धगुन्ह्यांचा आणि हिंसेचा पुरावा असल्याचा दावा फर्मनं केला आहे. लंडन पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या युद्धगुन्ह्याचा तपास करणाऱ्या विभागालादेखील अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे. काश्मीरमधील गुन्ह्यांची चौकशी करण्याची मागणी फर्मनं लंडन पोलिसांकडे केली आहे.

अमित शाह आणि मनोज नरवणेंच्या अटकेची मागणी करणारी फर्म तुर्कस्तानी अधिकाऱ्यांशी संबंधित असून ती पाकिस्तानच्या वतीनं काम करत असल्याचं सुत्रांनी सांगितलं. ब्रिटनच्या कोणत्याही प्राधिकरणानं या प्रकरणी भारतीय उच्चायोगाकडे संपर्क साधलेला नाही, अशी माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. ‘त्या अहवालात मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आणि नरसंहाराचा उल्लेख आहे. मात्र सीमेपलीकडून दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचा उल्लेख त्यात नाही. स्टोक व्हाईट नावाच्या लॉ फर्मनं ही याचिका दाखल केली आहे. या फर्मची कार्यालयं इस्तंबूल आणि लंडनमध्ये आहेत. या फर्मचे तुर्कस्तानशी उत्तम संबंध आहेत, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button