Top Newsराजकारण

सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून युवा कार्यकर्त्यावर सशस्त्र हल्ला

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर खोत याने आपल्या साथीदारांसह तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री घडला.

रविकिरण राजाराम माने (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कासेगाव पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत, अभिजित भांबुरे, स्वप्नील सूर्यवंशी (तिघे रा. इस्लामपूर) आणि सत्यजित कदम (शिराळा) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. भा. दं. वि.कलम ४५२,३२३,५०४,५०६,३४ आणि शस्त्र कायदा ४(२५) अन्वये हा गुन्हा नोंद झाला आहे.या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

माने रात्री आपल्या कुटुंबासोबत घरी जेवण करत होते. त्यावेळी सागर खोत आपल्या साथीदारांसह चाकू, गुप्ती, तलवार अशी प्राणघातक हत्यारे घेऊन माने यांच्या घरात घुसला होता. तू सदाभाऊंवर टीका करतोस का, तुला मस्ती आली आहे का, असे म्हणत माने यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांचे कुटुंबीय मध्ये पडल्याने हल्लेखोरांनी रविकिरण यांना ढकलून देत धक्काबुक्की करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने या चौघांनी चारचाकी मोटारीतून तेथून पोबारा केला. कासेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button