सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्यातील संशयित आरोपी आ. नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या ३० डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर २८ डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला.
सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत उद्या ३० डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले. कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला आहे.
नितेश राणेंचे वकील युक्तीवाद करताना चुकले !
नितेश राणेंच्या पीए राकेश परबने आरोपी सचिन सातपुते अनेकदा फोन केले होते, हे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. आरोपींचा नितेश राणेंशी संबंध असल्याचे तांत्रिक पुरावे आहेत. राकेश परबने सातपुतेला ३३ वेळा फोन केला होता, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला आहे. याला प्रत्युत्तर देण्यास उभे राहिलेले नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी युक्तीवादावेळी आरोपी आणि फिर्यादीच बदलून टाकले.
नितेश राणे आणि मारहाण करणारे आरोपी यांना संग्राम देसाई यांचा फिर्यादी असा उल्लेख केला, तसेच ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, त्या संतोष परब यांचा उल्लेख आरोपी म्हणून केला. काही वेळ असाच उल्लेख केल्याने गोंधळ उडाला. शेवटी राणेंसाठी युक्तीवाद करणारे प्रदीप घरत या दुसऱ्या वकिलांनी संग्राम देसाई यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. बाहेर पत्रकारांना या दुसऱ्या वकिलांनी हा किस्सा सांगितला.
यावेळी ते म्हणाले, तणावाचे वातावरण निवळले, कदाचित देसाई यांच्या मनातील बाहेर आले, असे हसत हसत सांगितले. त्यांना तुम्ही युक्तीवाद करताय ते आरोपीच्या वतीने करताय, फिर्यादीच्या वतीने नाही, याची मी त्यांना जाणीव करून दिल्याचे ते म्हणाले. सरकारी वकील या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.
व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही; नारायण राणेंचे कणकवली पोलिसांना उत्तर
मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे दिले आहे. राणे यांना कणकवली पोलिसांनी आज दुपारी ३ वाजता चौकशीसाठी हजर रहा, अशी नोटीस दिली होती.
खरे तर काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नितेश राणे कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्यांच्या घरावर ही नोटीस चिपकावण्यात आली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्र देऊन या नोटीसचे उत्तर दिले आहे. राणे आपल्या पत्रात म्हणतात की, मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही. कामामुळे आणखी दोन ते तीन दिवस व्यस्त राहणार आहे. व्हीसीद्वारे तुम्ही माझा जबाब घेऊ शकता, असे आवाहनही राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता यावर पोलीस काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.
राणेंच्या पाठीमागे भाजप खंबीरपणे उभी; फडणवीस
संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंचा शोध घेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, नारायण राणे यांच्या पाठीमागे भाजप खंबीरपणे उभी आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला ठणकावून सांगितलं.
पोलीस ज्या प्रकारे एकांगी वागत आहेत, या महाराष्ट्रातल्या दरोडेखोरांना पकडायला त्यांना वेळ नाही. बलात्काऱ्यांना पकडायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्रात जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे अपराध करतात त्यांना पकडायला वेळ नाही. पण नारायण राणेंच्या घरी जाऊन नोटीस द्यायला त्यांना वेळ नाही. जे काही चाललं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकार वागणे तालिबान्यांसारखे : आशिष शेलार
आमदार नितेश राणेंचा शोध घेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. आशिष शेलार यांनी हे सरकार तालिबान्यांसारखे वागत असल्याची घणाघाती टीका शेलारांनी केली.
नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसवरुन ॲड. आशिष शेलार यांनी ट्विट करत टीका केली. “कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलीस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…वारे वा..ठाकरे सरकार! फुले, शाहू, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! अशी खरमरीत टीका ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केली आहे.