पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का; आमदार कृष्ण कल्याणी यांचा पक्षाला रामराम

कोलकाता : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज पश्चिम बंगालमध्ये भाजपला अजून एक मोठा धक्का बसला असून, आमदार कृष्ण कल्याणी यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, खासदार आणि माजी मंत्री देवश्री चौधरी यांच्या संसदीय क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या घडामोडींमध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणे अशक्य झाले आहे. दरम्यान, कृष्ण कल्याणी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताच तृणमूल काँग्रेसने त्यांना भाजपत येण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
रायगंजमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कल्याणी यांनी सांगितले की, चौधरी यांनी यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी कटकारस्थान रचले. त्यांनी दावा केला की, रायगंजच्या खासदार देवश्री चौधरी या अनेक दिवसांपासून माझ्याविरोधात कारस्थान रचत आहेत. त्या मला विश्वासघातकी म्हणतात. मात्र वस्तुस्थिती ही आहे की, रायगंजमध्ये माझा पराभव व्हावा म्हणून कारस्थान रचणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होता. ही बाब त्यांच्या वैयक्तिक अजेंड्यामध्ये समाविष्ट होती.
कल्याणी यांनी आरोप केला की, त्यांच्या तक्रारींकडे राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाने काणाडोळा केला. त्यांनी सांगितले की, त्यामुळे मी आता स्वत:ला पक्षापासून वेगळं करणं योग्य समजतो. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू होत आहे. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला राजीनामा पाठवला आहे की, नाही. याबाबत माहिती त्यांनी दिलेली नाही.
कल्याणी यांनी पुढे सांगितले की, सध्यातरी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची माझी कुठलीही योजना नाही आहे. त्यांनी सांगितले की, सध्यातरी मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. हे भाजपामध्ये त्या व्यक्तीसोबत राहून शक्य होणारे नाही. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी भाजपा खासदारांनी कल्याणी यांच्यावर टीका करताना अशा आरोपांवर उत्तर देण्याची माझी इच्छा नाही असे सांगितले होते.