राजकारण

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला, भाजपला नाही; फडणवीसांचा टोला

जळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळामुळे झालेल्या शेती आणि केळीबागेच्या नुकसानाची पाहणी हे फडणवीसांच्या दौऱ्याचं मुख्य कारण होतं. मात्र यावेळी पत्रकारांनी जळगाव जिल्ह्यात भाजपला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता, डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आल्यावर त्यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं. माझ्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी मी चहाला गेलो. त्यामुळे यात कुणीही वावगं समजण्याचं कारण नाही, असं फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर डॅमेज कंट्रोलची गरज या सरकारला आहे. ठाकरे सरकारवर रोज लागणारे आरोप, सरकारची झालेली अवस्था आणि नुकताच लागलेला पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल, त्यामुळे या सरकारला डॅमेज कंट्रोलची गरज असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. आपला जळगाव दौरा फक्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस आणि शरद पवार भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राऊतांना टोला हाणलाय. संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. याचा वाईट अर्थ घेऊ नका, ते चांगले संपादक आहेत. पण ते नेमके कुणाचे आहेत, असा प्रश्न सातत्याने पडतो. त्यातच आता सामनाच्या मुख्य संपादक आमच्या वहिनी म्हणजे रश्मीताई ठाकरे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची अवस्था सध्या ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली असल्याची टीका फडणवीसांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button