मनसेने मुंबईसह ठाण्यात दहीहंडी फोडून केला ठाकरे सरकारचा निषेध

मुंबई : गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साधेपणाने घरी पूजाअर्चा करून साजरा करावा, दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक पूजाअर्चा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, हा उत्सव प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दहीहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये. मानवी मनोरे उभारून दहीहंडी साजरी करू नये. त्याऐवजी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असे गृहविभागाने म्हटले आहे. गृहविभागाने सोमवारी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता मुंबईसह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री करोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची नुकतीच बैठक घेतली. करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये नागरिक एकत्र आल्यास त्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे असे सण सामूहिकपणे साजरे करू नयेत, अशा सूचना केंद्र सरकारकडून आलेल्या आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोरोना निर्बंधांमध्ये दहीहंडीच्या काळात राज्य शासनाकडून सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.
ठाकरे सरकार हिंदूच्या भावना पायदळी तुडविणारे सरकार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमांसह दहीहंडी खेळता आली असती. थर आणि उपस्थितीबाबत मर्यादा, वयाचे बंधन घालता आले असते. सगळ्यांनी ते मान्यही केले असते; पण सणच साजरे करायचे नाहीत, ही राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे, असा आरोप नांदगावकर यांनी केला आहे.
शासन आदेशाचे उल्लंघन करून मनसेने दहीहंडी साजरी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावूनही त्यांनी रविवारपासून भगवती शाळेच्या मैदानात दहीहंडीची तयारी सुरू केली होती. सोमवारी स्टेज बांधणीचे काम सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी येऊन ते काम बंद पाडून अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करताच जाधव यांनी मनसैनिक म्हणजे नारायण राणे यांचे कार्यकर्ते नाहीत, असे सांगून मंगळवारी उत्सव जाहीर करणारच असे सांगितले होते त्यानुसार मध्यरात्री त्यांनी हा उत्सव साजरा केला.