राजकारण

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीच्या महिला साथीदाराला पुणे विमानतळावर अटक

पुणे : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला साक्षीदार किरण गोसावीचा पाय आणखी खोलात गेला आहे. नोकरीचे आमिष देऊन तरुणांना फसवल्या प्रकरणी किरण गोसावीची आणखी एक महिला साथीदार असलेल्या कुसुम गायकवाडला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. शिवराज जमादार या तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष दाखवत १ लाख ३० हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी किरण गोसावी आणि कुसुम गायकवाड यांच्यावर पुण्यातील लष्कर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लष्कर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत आरोपी कुसुम गायकवाड हिला अटक केली आहे. कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी मोठा शिताफीने तिला अटक केली आहे. तिची चौकशी सुरू असून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. याआधीही गोसावीच्या एका महिला साथीदाराला अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली होती.

किरण गोसावीवर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या ४ गुन्ह्यासह राज्यातील इतर भागात ही गोसावी याच्यावर ५ गुन्हे दाखल आहे. त्याच्याविरोधात लष्कर आणि वानवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे मिळून चार फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याआधी त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात ३ वर्षांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. ज्यांना ज्यांना किरण गोसावीने फसवले त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button