राजकारण

भाजपला आणखी एक झटका; उत्तर प्रदेशात सातव्या आमदाराचा राजीनामा

लखनौ : निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपमध्ये मोठी उलथापालथ होताना दिसतेय. येथे सरकारमधील मंत्री तसेच काही आमदार भाजपला सोडचीठ्ठी देत आहेत. काही दिवसांपूर्वी पाच आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील आमदार डॉ. मुकेश वर्मा यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्मा यांचा राजीनामा आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. वर्मा उत्तर प्रदेशमध्ये मासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जातात. वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या ७ वर पोहोचली असून भाजपसाठी ही मोठी हानी असल्याचे म्हटले जात आहे.

मुकेश वर्मा यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे. त्यांनी भाजपच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे. मागील पाच वर्षात दलित, मागास वर्गातील नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान दिलं गेलं नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्य़ोजक आणि व्यापाऱ्यांचीही घोर उपेक्षा झाली. त्यामुळे कुटनीतीचे धोरण अवलंबल्यामुळे राजीनामा देत असल्याचे वर्मा यांनी सांगितले. तसेच स्वामी प्रसाद मौर्य आमचे नेते आहेत. मी त्यांच्या सोबत आहे, असेदेखील वर्मा यांनी आपल्या राजीनामापत्रात सांगितले आहे.

दरम्यान, वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या सातवर पोहोचली आहे. याआधी स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच गुर्जर समाजाचे नेते आणि आमदार अवतार सिंह भडाना यांनी रालोदमध्ये प्रवेश केला. तसेच आणखी चार बड्या नेत्यांनी मोठा झटका दिला होता. उत्तर प्रदेश सरकारमधील स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर बांदाच्या तिंदवारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बृजेश प्रजापती यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर शाहजहापूरच्या तिलहर मतदारसंघाचे आमदार रोशनलाल वर्मा यांनी भाजपची साथ सोडली. त्याचबरोबर कानपूरच्या बिल्हौरचे आमदार भगवती प्रसाद यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button