कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे, काहीही बोलायचं !: अंजली दमानिया
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेते आणि जनआशीर्वाद यात्रेचे कोकणातील समन्वयक प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही संगमेश्वरमध्ये अटक झाल्याचे म्हटले होते. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली असून, कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे, काहीही बोलायचे, असे म्हटले आहे.
जनआशीर्वाद यात्रेचे परिवर्तन आता आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजपा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावे छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या सरकारचे थडगं या महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भाजपा राहणार नाही, असे प्रमोद जठार यांनी म्हटले होते. यावरून अंजली दमानिया यांनी ट्विट करत प्रमोद जठार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
नारायण राणेंच्या अटकेवर प्रमोद जठार म्हणाले "छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा संगमेश्वरला अटक झाली होती " ? कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे….. काहीहीबोलायचं…. कहा राजा भोज और कहा गांगु तेली.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 24, 2021
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 24, 2021
नारायण राणेंच्या अटकेवर प्रमोद जठार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा संगमेश्वरला अटक झाली होती? कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे…, असा टोला दमानिया यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना दमानिया यांनी, “काहीही बोलायचं…. कहा राजा भोज और कहा गांगु तेली’, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.