मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. परब यांनी मंगळवारी सोमय्यांविरोधात १०० कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना ७२ तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
सोमय्या यांनी परब यांच्यावर आरोप करतानाच काही पुरावेही सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला दिले होते. दरम्यान परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावत आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या सांगलीतील संपत्तीची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनीही यापूर्वी सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यासमोर आता केलेले आरोप सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.
किरीट सोमय्या यांना शिवडी कोर्टाचे समन्स
किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्थ या एनजीओवरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
सोमय्या यांना २२ सप्टेंबर, ५ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी लावावी लागणार
या आरोपांना आव्हान देत प्रवीण कलमे आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करून घेण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सोमय्या यांना येणाऱ्या २२ सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. एवढेच नाही तर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सोमय्या यांना खटाटोप करावा लागणार आहे.