![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/08/anil-parab-1.jpg)
मुंबई : ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता चौकशीसाठी हजर राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यानं आज ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल, असं परब यांनी सांगितलं.
इतर शिवसेना नेत्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. मी माझ्या बाबतीत बोलत आहेत. इतरांबद्दल बोलणार नाही, असं त्यांनी सांगितलं. पोलिसांनीही ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होते असं सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर अनिल परब यांनी न्यायालयात १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.